दिल्लीमधील जलसंकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
दिल्लीच्या जलमंत्री आतिशी मार्लेना यांच्या म्हणण्यानुसार काल दिल्ली जल बोर्डाच्या ग्राउंड पेट्रोलिंग टीमला दक्षिण दिल्ली रायझिंग मेन्समध्ये मोठी गळती झाल्याची माहिती मिळाली होती. गढी मेधू येथील डीटीएल सब स्टेशनवर टीमला आढळले की मुख्य पाइपलाइनमधून अनेक मोठे 375 मिमी बोल्ट आणि एक 12 इंच बोल्ट कापले गेले आहेत, ज्यामुळे गळती झाली.
या संदर्भात जलमंत्री आतिशी यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील मुख्य पाण्याच्या पाइपलाइनच्या संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे पुढील १५ दिवस पेट्रोलिंग आणि दिल्लीतील प्रमुख पाण्याच्या पाइपलाइनच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्याची मागणी केली.
आतिशी यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या दिल्लीमध्ये तीव्र उष्णता आणि पाण्याचे संकट आहे. यमुनेच्या पाण्याच्या कमतरतेमुळे, पाण्याच्या उत्पादनात सुमारे 70 एमजीडीची घट झाली असून दिल्लीच्या अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल ठरतो.
त्यांनी पुढे लिहिले की, दिल्ली जल मंडळाकडे मुख्य जल वितरण नेटवर्कसाठी गस्त पथके आहेत ज्या पाइपलाइन्सवर लक्ष ठेवतात . याशिवाय, दिल्ली सरकारने या कामात मदत करण्यासाठी एडीएमच्या देखरेखीखाली पथकेही तैनात केली आहेत.
आम आदमी पार्टीचे सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करत जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 14 ठिकाणी मटके फोडून भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील छतरपूर येथील जल बोर्ड कार्यालयाची तोडफोड केली. आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले आहेत की दिल्लीतील पाणीटंचाईला कोणी जबाबदार असेल तर ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. दिल्लीत पाणी साठवण्याची जागा आहे. हरियाणाही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी देत आहे. मात्र पाण्याची चोरी आणि अपव्यय हे या टंचाईचे मूळ कारण आहे.