केंद्र सरकारने नक्षलवादाचा संपूर्णपणे बिमोड करण्याचा निर्धार केला आहे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी नक्षलवादी हल्ले होत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय सुरक्षा दले तैनात करण्यात आली असून, सर्च ऑपरेशन्स केली जात आहेत. दरम्यान, झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गुवा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या कोल्हान जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये एक महिला नक्षलवादीही आहे. घटनास्थळावरून शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी याला दुजोरा दिला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन नक्षलवाद्यांना जिवंत पकडण्यातही यश आल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एक एरिया कमांडर आणि एक महिला नक्षलवादी आहे. झोनल कमांडर, एरिया कमांडर आणि सब-झोनल कमांडर याशिवाय ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
एसपी आशुतोष शेखर यांनी सांगितले की, सीपीआय माओवादी नक्षलवादी अमरवा पोलीस स्टेशन परिसरात जमा झाल्याच्या माहितीवरून सीआरपीएफ, झारखंड पोलीस आणि झारखंड जग्वार यांच्या संयुक्त पथकाला या कारवाईत हे यश मिळाले. घनदाट जंगलाचा फायदा घेत काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.