स्वाती मालिवाल प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमारच्या न्यायालयीन कोठडीत २२ जूनपर्यंत वाढ केली आहे. आज बिभव कुमारची न्यायालयीन कोठडी संपत होती, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
२७ मे रोजी न्यायालयाने बिभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला होता. १४ जून रोजी उच्च न्यायालयाने बिभव कुमारच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती. उच्च न्यायालय बिभवच्या जामीन याचिकेवर १ जुलै रोजी पुढील सुनावणी घेणार आहे. तीस हजारी न्यायालयाने ७ जून रोजी बिभव कुमारचा दुसरा जामीन अर्ज फेटाळला होता. या प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असून पीडितेला तिच्या सुरक्षेची काळजी असल्याचे तीस हजारी न्यायालयाने म्हटले होते. स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या खासदार असून त्या आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेल्या होत्या, असे तीस हजारी न्यायालयाने म्हटले होते. बिभव कुमारला जामीन मंजूर झाल्यास तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, अशीही शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
दिल्ली पोलिसांनी १८ मे रोजी बिभव कुमारला अटक केली होती. या प्रकरणी स्वाती मालीवाल यांनी १७ मे रोजी कोर्टात जबाब नोंदवला होता. घटना १३ मे ची आहे. १६ मे रोजी दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांचे जबाब नोंदवून एफआयआर नोंदवला होता.