देशभरात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात देखील गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या राजधानीत देखील पाऊस सुरु झाला आहे. मात्र मुंबई आणि उपनगरीय परिसराला अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये. येथील नागरिक अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईला एकूण ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता या ७ जलाशयांमध्ये केवळ ५ ते ६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जर येत्या काही दिवसात पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
आधीपासून म्हणजे १ जूनपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या धरणांमधून तलावातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मात्र सध्या मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे समजते आहे. त्यामुळे पाऊस न झाल्यास मुंबईवरील पाणीसंकट अधिक गडद होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.