काल 17 जून रोजी झालेल्या अपघाताच्या वेळी कांचनजंगा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मालगाडीच्या लोको पायलट आणि को-लोको पायलटविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
सोमवारी सकाळी 8.55 वाजता एका मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि उत्तर बंगालच्या जलपाईगुडी स्थानकाजवळ सियालदह-जाणाऱ्या कांचनजंघा एक्स्प्रेसला धडक दिली. दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा परिसरात हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
चिन्मय मजुमदार या प्रवाशाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ट्रेन पुढे जात असताना अचानक धक्का बसला आणि त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.यादरम्यान त्यांना स्वतःला दुखापत झाली असून काही सहप्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
ट्रेनमधून उतरल्यानंतर, त्यांना एका मालगाडीने मागच्या बाजूने कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिल्याचे दिसले, त्यानंतर मालगाडीच्या इंजिनसह काही भागाचे नुकसान झालेले दिसून आले. हा अपघात मालगाडीच्या लोको पायलट आणि को-लोको पायलट यांच्या घाई आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ संदीप कुमार सेनगुप्ता यांनी आज पुष्टी केली की आज आणखी दोन मृत्यूची नोंद झाल्यानंतर या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 10 झाली आहे.
“काल 37 लोकांना दाखल करण्यात आले होते, दोन लोकांची प्रकृती फारशी वाईट नव्हती म्हणून त्यांना सोडण्यात आले. दोन लोक गंभीर होते, दुर्दैवाने, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही आणि आज त्या दोघांचा मृत्यू झाला. ते व्हेंटिलेटरवर होते.”असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वे सुरक्षा विभागाचे मुख्य आयुक्त, ईशान्य सीमारेल्वे, जनक कुमार गर्ग,यांनी कांचनजंगा एक्सप्रेस दुर्घटनेच्या संदर्भात वैधानिक चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.