नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधीच्या दिवशी काश्मीरमध्ये भाविकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर सलग काही दिवस हल्ले सुरूच होते. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराला पूर्ण मोकळे केले आहे. त्यातच बंदिपुरा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय लष्कराने एका मोठ्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कराने मंगळवारी सांगितले की, 16 आणि 17 जूनच्या मध्यरात्री सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान बंदिपुरा येथील अरागम भागात ए श्रेणीतील दहशतवादी उमर लोनचा खात्मा केला आहे.
मंगळवारी बांदीपोरा येथे पत्रकारांना संबोधित करताना, आर्मी कमांडर 3 सेक्टर- राष्ट्रीय रायफल्स (आरआर) विपुल त्यागी म्हणाले की, सर्वोच्च श्रेणीतील कमांडरचे उच्चाटन करणे ही सुरक्षा दलांसाठी मोठे यश आहे. बांदीपोरा जिल्ह्यातील अरागम भागात दहशतवादी कारवायांबाबत विशिष्ट गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.