सौदी अरेबियातील मक्का येथे हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंवर उष्णतेने कहर केला आहे. १२ जून ते १९ जून या कालावधीत पार पडलेल्या हज यात्रेत आतापर्यंत एकूण ५७७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे. द गार्डियन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मृत्यू झालेल्या यात्रेकरूंमध्ये ३२३ इजिप्शियन आणि ६० जॉर्डनचे होते. याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काल सांगितले की, ते सौदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत आहेत. उष्णतेमुळे आजारी पडलेल्या सुमारे दोन हजार यात्रेकरूंवर उपचार सुरू असल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे.
द गार्डियनच्या वृत्तानुसार, १७ जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीत ५१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मक्कामध्ये हवामान बदलाचा खोलवर परिणाम होत आहे. येथील सरासरी तापमान दर १० वर्षांनी ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे. मागील वर्षी हजला गेलेल्या २४० यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश इंडोनेशियातील होते. सौदीने सर्व प्रवाशांना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांना सतत पाणी पिण्यास आणि सूर्यप्रकाश टाळण्यास सांगितले जात आहे. या वर्षी सुमारे १८ लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी १६ लाख लोक इतर देशांतील आहेत.