आसाममध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील परिस्थिती बिकट होत आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये १.६१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून आतापर्यंत २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर भागात भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला, त्यात एक महिला, तिच्या तीन मुली आणि एका तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर करीमगंज जिल्ह्यातील नीलमबाजार, आरके नगर, करीमगंज आणि बदरपूर महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या २२५ गावांना पुराचा फटका बसला आहे. २२,२६४ पूरग्रस्तांनी जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या मदत छावण्या आणि मदत वितरण केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी पहाटे हा इशारा जारी केला. ज्यामध्ये IMD ने पुढील 3 मध्ये आसाममधील बजाली, बक्सा, बारपेटा, बोंगाईगाव, चिरांग, दररंग, धुबरी, गोलपारा, कामरूप, कामरूप (मेट्रो), कोक्राझार, मोरीगाव, नलबारी, तामुलपूर, उदलगुरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तास पावसाचा अंदाज जारी केला.
IMD ने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, ३ तास उलटून गेले तरी पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे आसाममधील पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील जवळपास सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर किंवा जवळ पोहोचली आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य केले जात आहे.