राज्यसभा खासदार कविता पाटीदार यांनी बंगालमधून परतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रत्येक निवडणुकीनंतर फक्त पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार का होतो, असा सवाल केला आहे. निवडणुकीनंतर गरीब कामगारांची घरे का जाळली जातात, महिलांवर अत्याचार का होतात? असे का घडते? असे त्या म्हणाल्या आहेत.
कविता पाटीदार या त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार बिप्लब देब यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या चार सदस्यीय समितीच्या सदस्य आहेत, ज्यांनी अलीकडेच हिंसाचारग्रस्त पं. बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
राज्यसभा खासदार कविता पाटीदार यांनी सांगितले की, “भारतातील २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या. यासोबतच तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या, मात्र बंगाल वगळता कुठेही राजकीय हिंसाचाराची घटना घडलेली नाही. बंगाल हे एकमेव राज्य आहे जे निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या विळख्यात आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही तिथली भीषण परिस्थिती गांभीर्याने घेतली असून बंगालमधील केंद्रीय सैन्याच्या तैनातीची मुदत २१ जूनपर्यंत वाढवली आहे. हिंसाचारग्रस्त बंगालमध्ये आमचे कार्यकर्ते घाबरले आहेत, जनता घाबरली आहे. घरे, दुकाने जाळली जात आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत आणि त्यांची एफआयआरही नोंदवली जात नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे”.
कविता पाटीदार म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचाराची ही पहिलीच वेळ नाही. तेथे, पंचायत निवडणुका आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, टीएमसी कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थक गुंडांनी हिंसाचार केला होता. तेथे भाजप कार्यकर्त्यांची निवडक हत्या करण्यात आली, त्यांची घरे जाळण्यात आली आणि महिला कार्यकर्त्यांचा अपमान करण्यात आला. राजकीय सूडबुद्धीने भरलेला असा हिंसाचार लोकशाहीत आणि संविधानाच्या विरोधात अस्वीकार्य आहे. पाटीदार म्हणाल्या की, “वेळोवेळी लोकशाहीची हाक देणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा लोकशाहीवर थोडाही विश्वास असेल, तर त्यांनी या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा” .