पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज भारत दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे सदस्य मायकल मॅकॉल (Michael McCaul) यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड स्टेट्स काँग्रेसच्या द्विपक्षीय शिष्टमंडळाची भेट घेतली.अमेरिकेच्या माजी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) याही या शिष्टमंडळाचा एक भाग आहेत.या शिष्टमंडळाने काल तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाईलामा यांची त्यांच्या धर्मशाला येथील निवासस्थानी भेट घेतली होती.
बैठकीनंतर पेलोसी यांनी एक्स ला पोस्ट केले होते की “आज, धर्मशाळा, भारत येथे परमपूज्य, दलाईलामा यांना भेटण्यासाठी द्विपक्षीय काँग्रेसच्या शिष्टमंडळात सामील होणे हा माझा सन्मान होता. आमच्या बैठकीत, आम्ही तिबेटच्या लोकांसाठी यूएस काँग्रेसच्या समर्थनाची पुष्टी केली आहे” .
यूएस प्रतिनिधी – ग्रेगरी मीक्स, मारियानेट मिलर-मीक्स, निकोल मल्लिओटाकिस, अमी बेरा आणि जिम मॅकगव्हर्न हे भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचे इतर सदस्य आहेत. काल रात्री द्विपक्षीय शिष्टमंडळाने परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासह परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांचीही भेट घेतली.
जयशंकर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीसाठी यूएस काँग्रेसच्या सततच्या भक्कम पाठिंब्याचे कौतुक केले. एक्सवरील एका पोस्टमध्ये जयशंकर यांनी ते नमूद केले आहे.
यूएस काँग्रेसचे शिष्टमंडळ मंगळवारी भारतात आले होते आणि हिमाचल प्रदेशच्या कांगडा विमानतळावर केंद्रीय तिबेट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांना भेटण्यासाठी अमेरिकेचे खासदार धर्मशाला येथे पोहोचले होते.