सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (अंडरग्रॅज्युएट) 2024 मध्ये समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला आणि परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने प्रलंबित याचिकांसह ताज्या याचिकांना टॅग केले आहे आणि त्यावर ८ जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे.
नीट-यूजी २०२४ परीक्षेशी संबंधित याचिका उच्च न्यायालयांकडून सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या एनटीएने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली. खंडपीठाने विविध उच्च न्यायालयांसमोरील कार्यवाहीलाही स्थगिती दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटणे आणि इतर गैरप्रकारांच्या आरोपांवर खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. NEET-UG परीक्षेसाठी मेघालय केंद्रात बसलेल्या आणि ४५ मिनिटे गमावलेल्या काही विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि NTA यांना नोटीसही बजावली आहे २३ जून रोजी पुन्हा परीक्षेला बसण्याचा पर्याय देण्यात आला.