अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणपतिष्ठपना करण्यात आली. मात्र ही प्राणप्रतिष्ठपना करताना पौरोहित्य पाहणाऱ्या पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे दुःखद निधन झाले आहे. अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाचा अभिषेक करणारे काशीचे महान पंडित आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित शनिवारी पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
लक्ष्मीकांत दीक्षित यांचे सकाळी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते आणि ते बर्याच काळापासून वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. वाराणसीतील पंचगंगाघाट येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांच्यावर काशीतील मणिकर्णिकाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयराम दीक्षित यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजताच काशीतील विद्वान समाज, परिचित आणि हितचिंतकांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेतदेखील मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले, “देशातील महान विद्वान आणि सांगवेद विद्यालयाचे यजुर्वेद शिक्षक लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. दीक्षितजी हे काशीच्या विद्वान परंपरेतील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. काशी विश्वनाथ धाम आणि राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात मला त्यांच्या उपस्थितीत राहायला मिळाले. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न येणारी हानी आहे.”