दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या दिवस भारतात देखील राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्वानीच योग दिन साजरा केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दरबार साहिब संकुलात योगा करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या गुजराती तरुणी अर्चना मकवानाविरुद्ध अमृतसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने यापूर्वीच तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
दरबार साहिबचे व्यवस्थापक भगवंत सिंह यांच्या तक्रारीवरून अमृतसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत भगवंत सिंह यांनी म्हटले आहे की, 22 जून रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अर्चना मकवाना शहीद बाबा दीप सिंह यांच्या परिक्रमेदरम्यान एका ठिकाणी योगा करताना फोटो काढत होती. अर्चना मकवाना यांनी सोशल मीडियावर 2 फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती ध्यान आणि शिर्षासन करताना दिसत आहे. सुवर्ण मंदिराची प्रदक्षिणा करताना त्यांनी हे योगासन केले. हा फोटो पोस्ट करताना तिने स्वतः लिहिले की मी गुरुजींचे आभार मानते की त्यांच्या स्थानावरून मला योगाची शक्ती पसरवण्यात मदत मिळाली.
याप्रकरणी अर्चनाने माफीही मागितली असतानाच पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली. दरम्यान, एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी म्हणाले की, सुवर्ण मंदिरात असे काम करणे शीखांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. तरीही काही लोक या पवित्र स्थानाच्या पावित्र्याकडे आणि ऐतिहासिक महत्त्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून क्षुद्र कृत्य करतात. तरुणीने अवघ्या ५ सेकंदात योगाभ्यास पूर्ण केल्याचे तपासात समोर आले आहे. यावेळी 3 सुरक्षा कर्मचारी तिथे ड्युटीवर होते. प्राथमिक तपासानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे, तर एका कर्मचाऱ्याला 5,000 रुपये दंड आणि गुरुद्वारा गढी साहिब गुरुदास नांगल येथे बदली करण्यात आली आहे.