सध्या राज्यात आरक्षणावरून मराठी आणि ओबीसी समाजात संघर्ष होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ, लक्ष्मण हाके असा संघर्ष पाहायला मिळतोय. दरम्यान जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबाजवणी करण्यासाठी १३ जुलैची मुदत दिली आहे.सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून, आज ते अंतरवली सराटी येथे जाणार आहेत. मात्र त्यांच्या जाण्यापूर्वी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गावातील काही नागरिकांनी त्यांच्या आंदोलनाला विरोध केला आहे.
अंतरवाली सराटी येथील काही नागरिकांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच या गावातील अनेक नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवे अशी मागणी सरकारकडे केली आहे. मात्र ओबीसी समाजातील नेत्यांनी या मागणीला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर हा प्रश्न सुटला नाहीतर हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.