पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )पुढील महिन्यात रशियाला भेट देऊ शकतात.खुद्द रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे.जिथे ते त्यांचे खास मित्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची भेट घेणार आहेत.
व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र व्यवहार सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे, परंतु अजून तारीख नक्की ठरलेली नाही मात्र जर ही भेट झाली, तर जवळपास 5 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच रशियाला भेट असेल. मोदींनी सप्टेंबर 2019 मध्ये रशियाला भेट दिली होती. संयुक्तपणे तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे उशाकोव्ह यांनी सांगितले. मात्र, पंतप्रधान मोदींच्या संभाव्य दौऱ्याबाबत भारताकडून अजून कोणतेही दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी 2019 मध्ये पंतप्रधान मोदी शेवटचा रशियाला गेले होते. मात्र, आता वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे नियोजन केले जात आहे. पुतिन यांनी या वर्षी मे महिन्यात सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती, तर नरेंद्र मोदी यांनीही 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. जर ही भेट झाली तर फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींची ही पहिलीच रशियाला भेट असेल.
जर मोदी रशियाला गेले तर ते आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद आयोजित करू शकतात. भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातील ही वार्षिक शिखर परिषद दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीतील एक महत्वाचा भाग असणार आहे. आत्तापर्यंत भारत आणि रशिया यांच्यात अनुक्रमे 21 वार्षिक शिखर परिषदा एकमेकांच्या देशांमध्ये झाल्या आहेत. शेवटची शिखर परिषद 6 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे झाली. राष्ट्राध्यक्ष पुतिन हे शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. यामुळेच भारताने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबद्दल रशियाचा निषेध करण्यास टाळाटाळ केली आहे. अमेरिकेच्या सुरुवातीच्या दबावानंतरही नवी दिल्लीने रशियन क्रूडची खरेदी वाढवली आहे. देशांतर्गत तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी असे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे भारताचे म्हणणे आहे.