लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि काँग्रेसने आपल्या सर्व लोकसभा सदस्यांना 26 जून रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे.
एनडीएने कोटा येथील भाजप खासदार ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. यापूर्वी बिर्ला 2019 ते 2024 पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते. तर इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसने 8 वेळा खासदार के. सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. भाजपसोबतच काँग्रेसनेही आपल्या सर्व लोकसभा सदस्यांना उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे. एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला मजबूत स्थितीत आहेत. त्यांना 293 खासदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय त्यांना काही अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खासदारांचाही पाठिंबा मिळू शकतो. दुसरीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार के. सुरेश यांच्या समर्थनार्थ सुमारे 234 खासदार आहेत.
1952 नंतर प्रथमच 18 व्या लोकसभेत सभापतीपदासाठी लढत होणार आहे. एनडीएचे ओम बिर्ला यांचा सामना इंडिया आघाडीच्या के.के. सुरेश यांच्यासोबत असणार आहे.
काँग्रेसने लोकसभेतील आपल्या पक्षाच्या खासदारांना 3 ओळींचा व्हीप जारी करून उद्या बुधवारी 26 जून रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या पत्रात म्हंटले आहे की, उद्या लोकसभेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जाईल. लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया सकाळी 11 ते सभागृह तहकूब होईपर्यंत सभागृहात उपस्थित राहावे. हा संदेश अतिशय महत्त्वाचा मानला जावा असे नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेसचा हा व्हिप विरोधी पक्षाकडून लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार के सुरेश यांनी जारी केला आहे. त्याचवेळी भाजपनेही आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करून आज लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी अधिवेशनादरम्यान उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.