Sharad Pawar On PM Modi : आज (10 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांची नंदुरबारमध्ये सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केलं होतं. तर त्यांच्या या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी त्यांना मोठी ऑफर दिली आहे. शरद पवार बारामतीच्या निवडणुकीनंतर चिंतेत पडले आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं, अशी ऑफर पंतप्रधानांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी दिलेल्या या ऑफरवर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्यासोबत मी कधीच जाणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, जे देशाच्या हिताचं नाही त्यामध्ये माझं सहकार्य असणार नाही. तसेच अशा विधानांमुळे पंतप्रधान मोदींची अस्वस्थता दिसून येत आहे.
संसदीय लोकशाही ही पंतप्रधान मोदींमुळे संकटात आहे. तसेच आमची विचारधारा बी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.