आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता असून, हा उत्सव शांततेत व आनंदात पार पडावा, यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीला बंदोबस्तासाठी १६०० होमगार्ड नेमले आहेत. याशिवाय शहर-जिल्ह्यात प्रत्येकी एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी बोलावण्यात आली आहे.यंदाचा गणेशोत्सव १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद आहे. दोन्ही उत्सवाचे पावित्र्य राखले जावे, कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, यादृष्टीने उत्सव साजरा व्हावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तसेच सोशल मीडियातून प्रसारित होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास न ठेवता, त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मिरवणुकीत डिजे किंवा मोठ्या आवाजाची वाद्ये वापरता येणार नाहीत, दोन बेस, दोन टॉपसाठीच परवानगी राहील. पण, त्याचाही आवाज मर्यादित असणे जरुरी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचविणारी कृती खपवून घेतली जाणार नाही, संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.