आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी शैलपुत्री या दुर्गेच्या रूपाची पूजा केली जाते.ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे.नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते.
निसर्ग देवतेचं रूप असलेल्या शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्ध चंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे. म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारुढा असेही संबोधले जाते.देवी सतीने हिमालय कन्येच्या रुपात जन्म घेतला. तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच या देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. उत्तरप्रदेशमध्ये शैलपुत्री देवीचे एकमेव मंदिर काशीच्या अलईपूरमध्ये आहे. स्कंद पुराणातील काशी खंडातही देवीच्या या प्राचीन मंदिराचा उल्लेख आहे. नवरात्रामध्ये या देवीचे दर्शन घेण्यास भाविक मोठी गर्दी करतात.