दुर्गा देवीचे चौथे स्वरुप कुष्मांडा आहे. आजच्या दिवशी देवीच्या ह्या रूपाची आराधना केली जाते. ‘कु’ म्हणजे लहान, ‘ष्’ म्हणजे ऊर्जा आणि ‘अंडा’ म्हणजे ब्रह्मांडीय गोळा- सृष्टी किंवा उर्जेचा लहान ब्रह्मांडीय गोळा. असे मानले जाते की, विश्वाच्या निर्मितीपूर्वी, जेव्हा सर्वत्र अंधार होता, तेव्हा देवी दुर्गेच्या या रूपाने या ब्रह्मांडाची निर्मिती केली होती. तर काही वेळेस सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती.असेही सांगितले जाते. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे असे मानले जाते.
या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. आपण सूर्याकडे क्षणभरही पाहू शकत नाही. त्या सूर्यमंडलाच्या आतील भागात ही देवी राहते. त्यावरून या देवीचे तेज आपल्याला समजू शकेल.तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन वाघ आहे.
. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कूष्मांडा देवीची पूजा, उपासना करावी, असे सांगितले जाते.आजच्या दिवशी देवीला कोहळा अतिशय प्रिय असतो. त्यामुळेच आज देवीला कोहळ्याचा पेठा अथवा यज्ञामध्ये कोहळ्याचे तुकडे करून अर्पण केले जातात.
कुष्मांडा देवीचे मंदिर उत्तर प्रदेश (उत्तर प्रदेश) मधील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर शहरात बघायला मिळते. ती चतुर्भुज आकारात असून तिला दोन मुखे आहेत. वाराणसी मधलेही कुष्मांडा देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. नवरात्रामध्ये भाविक येथे गर्दी करतात.