हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा आणि मोठा सण म्हणजे दसरा. हा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो.अश्विन शुद्ध दशमी म्हणजे नवरात्रातील दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो.साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. यावर्षी दसरा शनिवारी (१२ ऑक्टोबर २०२४) येत असून, दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील देशभरात मोठ्या थाटा-माटात आणि उत्साहाने हा सण साजरा केला जाणार आहे.भारतात सर्वत्र दसर्याचा सण जल्लोषात साजरा केला जातो.
या दिवशी रावण दहन आणि सरस्वती पूजन, तसेच शस्त्रपूजन केले जाते. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची आणखी एक प्रथा आहे. बऱ्याच लोकांना याबद्दल खूप कमी माहिती असते आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाला.मारले. जो वाईटावर चांगल्याचा विजय होता. वाईट प्रवृत्तीचा नाश आणि त्यावर सत्प्रवृत्तीचा विजय हे सूत्र यातून समोर आले. तसेच देवीने ९ रूपे घेत ९ दिवस शुंभ निशुंभ,चंड मुंड रक्तबीज, महिषासुर अश्या राक्षसांचा निःपात केला. आणि आजच्या दिवशी देवीने अंतिम विजय संपादन केला. यातून संघर्ष हा नेहमी चांगल्या आणि वाईट शक्तीमध्ये होत असून अंतिम विजय मात्र चांगल्या शक्तीचाच होतो.हे दिसून आले. सीमोलंघन या मागेही असाच काहीसा अर्थ आहे.
दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा खूप जुनी आहे. ही प्रथा आजही टिकून आहे आणि सदैव राहील, पण सीमोल्लंघन म्हणजे काय ? तर सीमांचे उल्लंघन म्हणजे सीमोल्लंघन.
पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करत होते. महत्त्वाच्या लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निघण्याची प्रथा होती.याशिवाय अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विदेशात जाऊन व्यापार करायचे. कारण आजच्या दिवशी चांगला मुहूर्त असतो ज्यावर काही नव्या चांगल्या कामाची सुरवात केल्यास यश मिळते. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी नवं पीक घरात घेऊन येत. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.आजही काही गावामध्ये मुद्दाम गावाची वेस ओलांडत सीमोल्लंघन केले जाते.
आजच्या आधुनिक काळात सीमोल्लंघनाच्या नवनव्या कल्पना पुढे येऊ लागल्या. तसे म्हंटले तर आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रोजच सीमोल्लंघनाची गरज भासू लागली आहे.
पुढे काळ बदलला, काळाचे संदर्भ बदलले, आज सीमोल्लंघन केवळ व्यक्तिगत आयुष्यापुरते मर्यादित राहिले नसून ते देशाच्या पातळीवरील व्यापक कृती म्हणूनही पाहिले जाते. आज आपला देश खर्या अर्थाने चौफेर प्रगतीच्या, विकासाच्या दिशेनेे पुढे जात सीमोल्लंघन करत आहे.अलीकडच्या काळात भारताने एक मोठी उंची गाठली आहे.भारत केवळ जमिनीवर, पाण्यात आणि हवेत आपली कामगिरी बजावत नसून, त्यापलीकडे अवकाशात देखील भरार्या घेत आहे.मंगळयान, चांद्रयान-3, अशा मोहिमांमध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे.पाठोपाठ अवकाशात स्थानक उभारण्याची तयारी सुरू केली.पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडचे हे सीमोल्लंघन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे आणि व्यक्तिगत आयुष्यातील सीमोल्लंघनासाठी प्रेरणा देणारे आहे.
शरीराच्या इंद्रियांच्या,मनाच्या वृत्तीच्या,त्रिगुणांच्या,स्वभावाच्या संकुचितपणाच्या,मी ,माझे या सीमा ओलांडून विश्वपातळीवर जाण्यासाठी हा मुहूर्त आहे. एकदम कोणी जाऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी पाऊल तर टाकायला हवे. हा त्यासाठीचा मुहूर्त आहे.हा अर्थ त्यामागे दडलेला आहे.
म्हणूनच आजचा दिवस हा नवीन सुरूवातीचा दिवस.मानुयात आपल्या आयुष्यावर पडलेल्या,किंवा स्वतःच घालून घेतलेल्या सीमा ओलांडायचा दिवस, नवे संकल्प करण्याचा दिवस ,नवीन आव्हानांना सामोरे जायचा दिवस असे म्हणत नवे पाऊल टाकुयात