विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.यामध्ये सोयाबीनसाठी सात हजार भाव अधिक बोनस, सोबतच कांद्याला योग्य भाव देण्यासाठी समिती नेमणार आणि कापसासाठी सुद्धा योग्य भाव दिला जाईल, अशा घोषणा केल्या आहेत.
सोयाबीनच्या पडलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चाचा विचार करता पदरात काय पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. पिकांसाठी होणारा खर्च आणि हातामध्ये काय पडते, या संदर्भात त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता त्यांंनी उपरोक्त घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांसोबतच्या संवादात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की, सोयाबीन पिकवण्याची किंमत चार हजार रुपये प्रति क्विंटल, सोयाबीनची विक्री किंमत तीन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे या व्यवहारात शेतकऱ्यांचे एक हजार रुपये प्रति क्विंटल इतके नुकसान होते. उत्पन्न दुप्पट करण्याचे विसरून सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या किमतीच्या तीन चतुर्थांश दराने पिकांची विक्री करण्यास भाग पाडले आहे.
शेतकऱ्यांसोबतच्या संवादात ते असेही म्हणाले होते की, २०२१ मध्ये सोयाबीनचे भाव १० हजार रुपयांपर्यंत होते, पण आता शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी किमतीत विकावे लागत आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४,८९२ रुपये आहे, परंतु शेतकऱ्यांना सुमारे ४,२०० रुपयांना विकावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना यापेक्षाही कमी भाव मिळत आहे. चांगले उत्पादन होऊनही योग्य भाव न मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत. महाविकास आघाडीला शेतकऱ्यांच्या समस्या कळतात. आम्ही सरकार स्थापन करताच योग्य किंमत देण्याचा मार्ग शोधू.