केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी आज लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. संविधान हातात धरून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी प्रियंका गांधी सभागृहात प्रवेश करत असताना त्यांचे भाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रियंकाचा फोटो काढला. यादरम्यान काँग्रेसचे अनेक खासदारही उपस्थित होते.शपथ घेतल्यानंतर राहुल गांधींनी प्रियंका गांधींना मिठी मारली.
त्यांच्याबरोबरच लोकसभेचे कामकाज सुरू होताच नांदेड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या रवींद्र चव्हाण यांनीही खासदारकीची शपथ घेतली. प्रियांकाने हिंदीतून तर रवींद्र यांनी मराठीतून शपथ घेतली. दोघांनी शपथ घेतल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी संभल हिंसाचार आणि अदानींच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे .
प्रियंका गांधी यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक मोठ्या मतांनी जिंकली आहे. प्रियांका गांधी यांना 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली, तर सीपीआयचे उमेदवार सत्यम मोकेरी 2 लाख 11407 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. या जागेवर भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप उमेदवार नव्या हरिदास यांना 1 लाख 99939 मते मिळाली होती .राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवली आणि राहुल यांनी दोन्ही जागा जिंकल्या होत्या. पण खासदार एकच जागा ठेवू शकत असल्यामुळे राहुल गांधींनी रायबरेलीची जागा स्वीकारली आणि वायनाडचा राजीनामा दिला. या जागेवर 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक झाली आणि 23 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निकालात प्रियांका गांधी विजयी झाल्या. आता प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदेत पोहोचल्या आहेत.
गांधी घराण्यातील तीन लोक सध्या संसदेत आहेत. जिथे राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. तर त्यांची आई सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि आता प्रियांका गांधी लोकसभेत पोहोचल्या आहेत.