राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ल्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत घोषणा केली आहे.31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली आहे.अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व किल्ल्यांमधील अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही किल्ल्यावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची नेमणूक देखील करण्यात आली आहे. राज्यात केंद्र संरक्षित 47 किल्ले आणि राज्य संरक्षित 62 किल्ले आहेत. आता या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 31 जानेवारीपर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणांची यादी मागवली आहे.
विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणानंतर गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशाळगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.