वक्फ दुरुस्ती विधेयक नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात मजूर झाले असून राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला विरोधकांनी विरोध दर्शवला होता. तसेच देशातील काही भागात या बिलाच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. वक्फ कायद्याची देशभरात एवढी चर्चा सुरु असताना आता त्याचे पडसाद जम्मू काश्मीरच्या विधानसभेत पडले असल्याचे दिसून येत आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेत तिसऱ्या दिवशीही गोंधळ सुरू आहे. वक्फवर चर्चा व्हावी अशी मागणी करत नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी जोरदार निषेध केला.
पण भाजपच्या आमदारांनी याला विरोध केला.त्यानंतर आमदारांमध्ये चक्कं सभागृहातच हाणामारी सुरु झाली. केवळ विधानसभेतच नाही तर बाहेरही आमदारांमध्ये मोठी झटापट झाली. सध्या सभागृहाचे कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
भाजपचे आमदार विक्रम रंधावा आणि आपचे आमदार मेहराज मलिक यांच्यामध्ये सुरूवातीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. मलिक यांनी हिंदूंना शिवीगाळ गेली. हिंदू टिळा लावून दारू पितात, चोरी करतात, असे आपचे आमदार म्हणाल्याचा दावा रंधावा यांनी केला. यावेळी रंधावा प्रचंड आक्रमक झाले होते. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
दरम्यान जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या आवारात आमदारांमध्ये हाणामारी झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला तसेच वक्फ कायद्यावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी एनसी आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.