२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारतात तीव्र संताप उसळला आहे. भारताने हा हल्ला पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी गटांनी केला असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानने मात्र हे आरोप फेटाळून लावत निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. मात्र आता या घटनेमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. भारताने काही कठोर निर्णय घेतल्याने पाकिस्ताननेही त्याला विरोध दर्शवला आहे. पण आता पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्ला तरार यांनी व्हिडिओ संदेशामध्ये दावा केला की, भारत येत्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. भारताला वेळीच रोखले पाहिजे, हे जागतिक समुदायाला सांगणे हा या व्हिडिओचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने या तणावात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लवकरच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत पण अमेरिकेने नेमके काय म्हंटले आहे? आणि या दोन्ही देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची भूमिका नेमकी काय आहे? याच गोष्टींचा घेतलेला हा मागोवा.
अमेरिकेची मध्यस्थी आणि भूमिका
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील वाढता तणाव पाहता तो कमी करण्यासाठी अमेरिका पुढे आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मॅरको रुबिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी संपर्क साधला असून, संयम बाळगण्याचे आणि संवाद सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉम ब्रूस यांनी स्पष्टपणे सांगितले की, अमेरिका दोन्ही देशांच्या सतत संपर्कात आहे. त्यांनी सांगितले की, “आमचं लक्ष काश्मीरमधील घडामोडींवर आहे. आम्ही दोन्ही सरकारांशी बोलतो आहोत. शांततेच्या मार्गानेच या समस्येचा तोडगा निघायला हवा.”
अमेरिकेचा भारताला पाठिंबा
हल्ल्यानंतर अमेरिकेने या हल्ल्याचा पूर्णपणे निषेध केला असून भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेच्या बाजूने उभी राहिली आहे. एफबीआयचे संचालक कॅश पटेल यांनी भारताला “पूर्ण पाठिंबा” असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवून भारतासोबत एकजूट असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी यापूर्वीही म्हटले होते की, “भारत आणि पाकिस्तान दोन्ही आमचे महत्त्वाचे मित्र आहेत. चर्चेच्या माध्यमातूनच उपाय काढावा.”
खरतर अमेरिका या संकटात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेवर त्यांचे स्पष्ट मत नाही. अमेरिका भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांना पाठिंबा देत आहे, परंतु पाकिस्तानच्या भूमिकेवर त्यांचे मत अस्पष्ट असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असला तरी, अमेरिका शांतता आणि संवादाच्या मार्गाने या संकटाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. खरतर हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहे. विशेष म्हणजे, पाक सरकार आणि त्यांचे नेते भारतालाच धमकी देत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या पीपीपी पक्षाच्या महिला खासदार पलवाशा मोहम्मद झई खान यांच्या भारताविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ वायरल होत आहे.
🚨Pakistani Senator Palwasha Zai Khan:
“The first brick of the new Babri Mosque in Ayodhya will be laid by Pakistan Army soldiers, and the first azan will be given by Pakistan Army Chief General Munir.”
“We are not wearing bangles.”
When the war is over bring her to India. pic.twitter.com/t9e6KLWrct
— BALA (@erbmjha) April 30, 2025
संसदेत बोलताना त्यांनी म्हटले आहे की “तो दिवस दूर नाही जेव्हा पाकिस्तानी सैनिक अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट ठेवतील आणि लष्करप्रमुख असीम मुनीर तिथे अजान देतील.” भारताला धमकी देताना त्यांनी अक्षरशः गरळ ओकली आहे. त्या म्हणाल्या की “जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर लाल किल्ल्याचे मैदान रक्ताने माखले जाईल. पाकिस्तानकडे वाईट नजर टाकणाऱ्यांचे डोळे काढले जातील.” भारत-पाकिस्तान सबंधात आधीच तणाव वाढलेला असताना पलवाशा यांचे हे विधान आगीत तेल ओतणारे ठरू शकते. आता भारताविरुद्ध असे वादग्रस्त विधाने करणाऱ्या त्या काही एकमेव व्यक्ती नाहीयेत तर तर याधीही अनेक पाकिस्तानी नेत्यांनी अशाच प्रकारची भडकाऊ विधाने केली आहेत. मग त्यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद,पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ या आणि अशा अनेक नेत्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
एवढेच नाही तर एवढा मोठा हल्ला होऊनही भारताच्या इशाऱ्याला न जुमानता पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उलंघन करणे सुरूच आहे. यावरुन पाकिस्तानची मुजोरी दिवसेंदिवस वाढतंच असल्याचे दिसून येत आहे.असे असताना अमेरिका शांततेच्या मार्गानेच या समस्येचा तोडगा निघावा याच भूमिकेवर ठाम असेल तर मग शांतता फक्त भारतानेच ठेवायची का? पाकिस्तान सैन्य दिवसेंदिवस भारतीय सैनिकांवर गोळीबार करत असताना यावर अमेरिका का बोलत नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पुढे काय
सध्या भारताची लष्करी तयारी अधिक तीव्र होत आहे. सीमेवर सैनिकांची हालचाल वाढली असून हवाई दलालाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघासह इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना पुरावे सादर करून पाकिस्तानवर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानही आपल्या सीमांवर सज्ज आहे. परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारे समर्थन तुलनेत कमी आहे. आता अमेरिकेने जरी दोन्ही देशांना शांतात राखण्याचे आवाहन केले असले तरी पाकिस्तानची वाढती मुजोरी पाहता भारताला वेळीच काहीतरी निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला फ्री हँड दिला आहे. यापूर्वी 2016 मध्ये पाकिस्तानने उरीवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी भारतीय सैन्याला असाच फ्री हँड दिला होता. तेव्हा भारतीय सैनिकांनी आपले शौर्य दाखवत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असा मोठा संदेश जगाला दिला होता. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये मोठा धमाका झाला तर आश्चर्य वाटायला नको.