आधी पाणी बंद…आता जेवणासाठीही महागणार पाकिस्तानी लोक…पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानला धडा शिवण्यासाठी भारत सरकार सातत्यताने एका मागून एक पाऊले उचलत आहे. अशातच भारताकडून आता पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक सुरू आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने आधी सिंधू पाणी करार थांबवला नंतर अटारी वाघा सीमेवरून व्यापार थांबवला आणि आता पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घातली आहे. भारताकडून सुरु असलेल्या डिजिटल स्ट्राइक मध्ये पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्यासह अनेक व्हीआयपी लोकांचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.
खरं तर सोशल मीडिया आणि यूट्यूब हे पाकिस्तानी लोकांसाठी मोठे उत्पन्नाचे स्रोत आहे. विशेष म्हणजे भारतात पाकिस्तानी चॅनलला बघणारा वर्ग जास्त आहे. अशातच भारत सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठे आर्थिक नुकसान होणार हे नक्की…
पाकिस्तानी युट्युब चॅनेलवर का घातली बंदी
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी युट्यूब, सारख्या सोशल मीडियाचा वापर करत आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाकिस्तान आपली प्रतिमा जगासमोर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारतातील वातावरण बिघडवण्यासाठी देखील यूट्यूबचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पाकिस्तानच्या या डिजिटल कटाला भारताने प्रत्युत्तर देत भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या YouTube चॅनेलवर भारतात बंदी आणण्याचा निर्णय घेतला.
चुकीच्या माहितीच्या प्रचार
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान निराधार, खोट्या आणि वादग्रस्त सामग्रीचा प्रसार युट्यूबवर करत होती. आणि म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने या वाहिन्यांवर कारवाई करत भारतात बंदी घातली. त्याच वेळी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ‘उग्रवादी’ म्हणणाऱ्या जगप्रसिद्ध वृत्तसंस्था बीबीसीच्या वृत्तावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. तसेच, बीबीसीच्या कव्हरेजवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी चॅनेल्सवर बंदी घालण्याच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्यावर तात्काळ बंदी घातली.
खोट्या बातम्या प्रसारित करण्यात सहभाग
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर, या पाकिस्तानी वाहिन्यांनी भारतीय सैन्य, सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांविरुद्ध खोटे आणि दिशाभूल करणारे कार्यक्रम प्रसारित केले. यापैकी काही चॅनेल भडकवणाऱ्या तसेच संवेदनशील सामग्री देखील प्रसारित करत होत्या. त्यामुळे, पाकिस्तानी नॅरेटिव्ह प्रचाराला आळा घालण्यासाठी सरकारने बंदी चा निर्णय घेतला.
कोणत्या पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी
प्रमुख चॅनेल्समध्ये डॉन न्यूज (१.९६ दशलक्ष सबस्क्राइबर), समा टीव्ही (१२.७ दशलक्ष), एआरवाय न्यूज (१४.६ दशलक्ष) आणि जिओ न्यूज (१८.१ दशलक्ष सबस्क्राइबर) यांचा समावेश होता. इतर चॅनेल्समध्ये बोल न्यूज (७.८५ दशलक्ष), जीएनएन (३.५४ दशलक्ष) आणि सुनो न्यूज एचडी (१.३६ दशलक्ष) यांचा समावेश होता. या चॅनेल्सचे एकत्रितपणे ६३.०८ दशलक्ष सबस्क्राइबर होते, जे त्यांची विस्तृत पोहोच दर्शवते. इर्शाद भट्टी (८२७ हजार) आणि रफ्तार (८०४ हजार) सारख्या वैयक्तिक चॅनेल्सचाही या यादीत समावेश होता. सोबतच क्रिकेटर शोएब अख्तरचा देखील चॅनेल बंद करण्यात आला आहे.
युट्यूब सोबतच पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाऊंटही बंद
भारत सरकराने पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाऊंटही भारतात बंदी आणली आहे. यामध्ये माहिरा खान, हानिया आमिर, सनम सईद आणि अली जफर यांच्यासह अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
भारतात मोठा प्रेक्षकवर्ग
भारतातील मोठ्या प्रेक्षकवर्गामुळे या चॅनेल्सना लक्षणीय कमाई होत होती. भारतात बंदीमुळे या चॅनेल्सचे व्ह्यूज आणि जाहिरात महसूल कमी होईल, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होईल. याच सगळ्यात जास्त परिणाम हा स्थानिक पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवर होईल. वैयक्तिक स्तरावर, शोएब अख्तरसारख्या यूट्यूबर्सना लक्षणीय आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
पहलगाम हल्ला
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना लक्ष करण्यात आले. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या क्रूर घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. व ठीक-ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. या घटनेची आंतराष्ट्रीय स्थळावरून देखील निंदा करण्यात आहे.