एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या रम्य पाहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला हा केवळ एक हिंसक घटना नव्हती तर तो मानवतेचा खून होता. बैसरन खोऱ्याच्या हिरव्या टेकड्यांवर, जेथे निसर्गाने आपले सौंदर्य मुक्तहस्ते उधळले आहे, तिथेच माणसाने माणसाला मारण्याचा खेळ सुरू केला. निसर्गाने दिलेले सौंदर्य जणू रक्ताच्या ओघळांमध्ये हरवले. या हल्ल्याच्या थरकाप उडवणाऱ्या बाबींपैकी सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी धर्माच्या नावावर माणूस मारला. ‘कलमा’ वाचता येतात का विचारणे हे श्रद्धेचे परीक्षण नव्हते, तर माणुसकीची चेष्टा होती. दहशतवाद्यांची ही क्रूर मानसिकता केवळ हिंसेपुरती मर्यादित नव्हती; ती संपूर्ण देशात धार्मिक विष पसरवण्याचा डाव होता. धर्म, ज्याने माणसाला माणसाशी जोडायला हवे, त्याचा वापर माणसाला मारण्यासाठी करण्यात आला. पण आता या निमिताने एक प्रश्न निर्माण होतो की दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी पहलगामची निवड का केली? यामागे त्यांचा नेमका काय प्लान होता? तेच आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
पहलगाममध्ये झालेल्या हल्यानंतर सरकारने या दुर्घघटनेचा सखोल तपास करण्याचे निर्देश संबंधित तपास यंत्रणांना दिले. सध्या या हल्याचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) करत आहे. यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत, जी पुरावे गोळा करण्यासाठी आणि संशयितांची ओळख पटवण्यासाठी काम करत आहेत. या तपासात अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. तपासादरम्यान हल्ल्याचा कालखंड आणि ठिकाण निवडणे काहीसे ठरवूनच केल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:45 वाजता, पर्यटकांची संख्या वाढलेली असताना, लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने बैसरन व्हॅलीमध्ये गोळीबार करत 26 निष्पाप जीवांचा बळी घेतला. हे ठिकाण पाहलगाम शहरापासून अवघ्या 6 किलोमीटरवर असून, ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध आहे.
या भ्याड हल्ल्यामागे अनेक पद्धतशीर रणनीती होत्या हे आता उघड झाले आहे. एक आठवड्यापूर्वीच दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यातील विविध पर्यटन स्थळांची रेकी केली होती. बैसरनमधील अम्युझमेंट पार्कमध्ये गर्दी कमी असल्यामुळे तिथे हल्ला करण्याचे त्यांनी टाळले आणि गर्दी असलेल्या घाटीची निवड करण्यात आली. 20 आणि 21 एप्रिल रोजी पाऊस पडल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होती, त्यामुळे 22 एप्रिलची निवड करण्यात आली. कारण तेंव्हा गर्दी पुन्हा वाढली होती. पाहलगामची निवड यासाठीही केली गेली की हे ठिकाण अमरनाथ यात्रेच्या मार्गावर असून, येथे देशभरातून लाखो भाविक आणि पर्यटक वर्षभर येतात. अशा ठिकाणी हल्ला केल्याने देशात दहशतीचे वातावरण निर्माण करता येते, अशी दहशतवाद्यांची नीती दिसते.
तसेच तपासानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने, दहशतवाद्यांना परिसराची माहिती मिळवणे आणि हल्ला करण्यासाठी योग्य स्थळे निवडणे सोपे झाले अशी शंका आहे . याशिवाय, शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात सुरक्षेची उपस्थिती तुलनेने कमी असते, नेमका याचाच फायदा त्यांनी घेतला. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कठोर मोहीम राबवत ७५ ओव्हर ग्राउंड वर्कर्स अटक केले आहेत. एनआयए आणि पोलिसांनी ३,००० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. अटक केलेले बहुतेक लोक दक्षिण काश्मीरमधील आहेत. पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना स्थानिक लोकांनी मदत केल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
या हल्ल्याच्या वेदनादायक बातम्यांनी देशभरातील प्रत्येक घरात दुःखाचे सावट पसरले. काहींनी आपले पती गमावले, काहींनी भाऊ, वडील, मैत्रीण. त्यांचे घर सुने झाले, आणि एका क्षणात कुटुंबातला आधार नाहीसा झाला. त्यांच्या जागी आपणही असू शकलो असतो ही भावना देशवासीयांच्या अंतःकरणात खोलवर रुजली. पण देशाने ही वेदना शरणागतीने स्वीकारली नाही. सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम राबवली. तसेच मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव टाकला, कारण या हल्ल्याच्या मागे सीमा पारची छुपी कृती असल्याचे स्पष्ट झाले. हा हल्ला देशाला कमकुवत करायला झाला होता, पण त्याने देश अधिक एकवटला. एवढा मोठा हल्ला होऊनही पर्यटक पुन्हा हलगाममध्ये जाताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. खरतर हे त्या दहशतवाद्यांना थेट उत्तर आहे. की आम्ही घाबरणार नाही. आम्ही तुमच्यामुळे आमचे जीवन थांबवणार नाही.
एकूणच पाहलगाम हल्ला हा फक्त एका प्रदेशावरचा हल्ला नव्हता, तर तो संपूर्ण देशाच्या मनोबलावर केला गेलेला वार होता. निसर्गाच्या कुशीत घडलेली ही अमानवी घटना आपल्या समाजात लपलेल्या भीषण कटकारस्थानांची आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांची साक्ष देते. पण या घटनेनंतर देश झुकला नाही, ढासळला नाही, उलट अधिक बळकट झाला. दहशतवाद्यांचे उद्दिष्ट भय पसरवण्याचे होते, परंतु भारताने त्याला उत्तर दिले तेही संयमाने, जागरूकतेने आणि ठामपणे. तसेच सरकारने सुरक्षा मोहीम राबवली, संशयितांवर कारवाई केली, आणि नागरिकांनीही दाखवून दिले की ते भयाने नव्हे, तर निडरतेने जगतात. पुन्हा एकदा देशभरातून पर्यटक पाहलगामला गेले, यात्रेच्या नोंदण्या सुरू राहिल्या आहेत. यावरून हे स्पष्ट झाले की भारताच्या लोकांची श्रद्धा, निसर्गप्रेम आणि माणुसकीवरचा विश्वास कोणीही डगमगवू शकत नाही. या हल्ल्याची आठवण कायम टोचणारी असेल, परंतु त्यावरचा देशाचा प्रतिसाद ही प्रेरणादायक शिकवण आहे की माणुसकीवरचा विश्वास आणि एकोपा, या गोष्टी कोणत्याही दहशतीपेक्षा अधिक ताकदवान असतात.