.Rafale-M Deal:पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. हा तणाव आता इतका टोकाला गेला आहे की, कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानला चीन आणि तुर्कीने हत्यारे व क्षेपणास्त्र पुरविली असल्याची माहिती समोर आली आहे. आता भारत सरकारनेही एक पाऊल उचलत फ्रान्ससोबत 27 एप्रिल रोजी एका करारावर स्वाक्षरी केली आहे, या करारा अंतर्गत भारतीय नौदलासाठी 26 सागरी लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. विशेष म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यात सातत्यानेच सुरू असलेला संघर्ष आणि भारत चीन यांच्यात सुरू असलेला सीमावाद या दृष्टिकोणातून हा करार अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीन यांच्या तुलनेत या करारामुळे भारताची ताकद किती वाढेल याची सविस्तर माहिती आपण घेऊयात.
खरेतर भारताकडे आधीचे ३६ हवाई लढाऊ विमाने आहेत. परंतु नवीन करारानुसार भारत सागरी लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे फ्रान्सची विमान तयार करणारी ‘डसॉल्ट एव्हिएशन’ कंपनी या विमानामध्ये भारताच्या गरजेनुसार अनेक बदल करणार आहे. अर्थातच या सागरी लढाऊ विमानांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळेल. जसे की, यामध्ये जहाजाविरोधी हल्ला, अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आणि १० तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यांसारखी वैशिष्ट्ये असणार आहेत. ही राफेल विमाने भारताचे सर्वात मोठे युद्ध जहाज असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेवर विमाने तैनात केली जाणार आहेत. या 26 लढाऊ विमानांपैकी 22 सिंगल सीटर असणार आहेत, तर चार डबल सीटर असणार आहेत.
आता भारत आणि पाकिस्तान यांच्या नौदलाची तुलना करायची झाल्यास भारताकडे सध्या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस विक्रमादित्य’ अशी भारताच्या युद्धनौकांची नावे आहेत. तर पाकिस्तानकडे एकही विमानवाहू युद्धनौका नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीलाही नौदल सुरक्षेत भारत पाकिस्तानच्या खूपच पुढे आहे.
तसेच सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात जी युद्धाची परिस्थीती निर्माण झाली आहे त्या दृष्टीकोणातून हा करार उपयोगी ठरेल का?, तर भारताने फ्रान्ससोबत केलेल्या करारानुसार ही सागरी लढाऊ विमाने भारतात २०२९ किंवा २०३० मध्ये पोहचणार आहेत. त्यामुळे सध्या भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास ही सागरी लढाऊ विमाने अस्तित्वात नसणार आहेत. परंतु भविष्यात पाकिस्तानसह इतर देशांवर दबदबा तयार करण्यासाठी भारतासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे.
आता चीनची तुलना करायची झाल्यास आणि या कराराबद्दल बोलायचे झाल्यास सध्याच्या घडीला चीनकडे तीन विमानवाहू युद्धनौका आहेत आणि ते इतर दोनवर काम करत आहेत. जगातील सर्वात मोठे नौदल असलेल्या देशांमध्ये चीनचा नंबर लागतो.२०२१ च्या पेंटागॉनच्या वार्षिक चीन लष्करी अहवालानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीच्या ताफ्यात 355 जहाजे होती. 2030 पर्यंतकडे 460 जहाजे असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या भारताची नौदल तादक चीनपेक्षा काहीशी कमी दिसते. त्यामुळे भारताने जो सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे तो भारताची नौदल ताकद सिद्ध करण्याच्या दृष्टिकोणातून महत्वाचा मानला जात आहे. परंतु आजपर्यंत भारत आणि चीन यांच्यात थेट नौदल युद्ध झाले नाही. पंरतु आपली सामरिक ताकद दाखवण्यासाठी भारताकडे राफेलसारखे सागरी लढाऊ विमान असणे आवश्यक आहे. यामुळे केवळ पाकिस्तानवरच नव्हे तर चीनवरही दबाव वाढेल. अर्थातच भारताने भविष्य डोळ्यासमोर ठेवून हा करार केला आहे.
खरेतर 1962 मध्ये झालेल्या भारत आणि चीनच्या युद्धानंतर पाकिस्तान-चीन यांच्यातली मैत्री वाढत गेल्याचे म्हटले जाते. कारण चीन आणि पाकिस्तान या दोनही देशांसाठी भारत हा शत्रू देश बनला होता. सध्या भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेले असतानाच आपण पाकिस्तान आणि चीन यांचे संरक्षणात्मक संबंध समजावून घेऊयात.
– सध्या पाकिस्तानच्या सैन्याला चीनमध्ये प्रशिक्षण दिले जाते. दोन्ही देशांची सैन्यं संयुक्त सराव करतात. शिवाय, दोन्ही देशांचा दहशतवादविरोधी अभ्यासही एकत्रच होतो, अशी माहिती उपलब्ध आहे.
– उपलब्ध असलेल्या माहितीनुसार चीनमध्ये तयार होणारी अवजारे सगळ्यात जास्त पाकिस्तान आयात करतो.
– चीन पाकिस्तानला युद्धनौका, विमाने आणि क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी मदत करत असल्याच्याही बातम्या समोर येत असतात.
ही परिस्थीती पाहता अनेक तज्ञांनी भारताचा सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत भारतीय नौदलाला यामुळे खूप बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच काही तज्ञांनी म्हटलेय की, 26 सागरी लढाऊ विमाने पुरेशी नाहीत तर सुमारे ६० ते ७० सागरी लढाऊ विमानांची भारताला आवश्यकता आहे.