India Vs Pakistan: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता यासंबंधीचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलल्याचे आपण पाहिले आहे. भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहेत. तसेच पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यातच आता भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला घाम फोडणारा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 2 मे रोजी अधिसूचना काढली आहे. त्यानुसार आता पाकिस्तानमध्ये निर्मिती झालेली वस्तू थेट भारतात आयात होणार नाही. तसेच इतर देशांच्या माध्यमातूनही पाकिस्तानची वस्तू भारतात आयात होणार नाही. अर्थातच पाकिस्तानातील कोणतीही वस्तू आता भारतात मिळणार नाही. यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानसोबतचे आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याच्या दिशेने भारत सरकारकडून पावले टाकली जात आहे. आता भारताच्या या निर्णयाचा भारत आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याची सविस्तर माहिती आपण घेऊयात.
भारत पाकिस्तानामध्ये कोणत्या गोष्टींची आयात- निर्यात होते:
तसे पाहायला गेले तर सध्या भारत आणि पाकिस्तानचा व्यापार संबंध मर्यादित आहे. परंतु काहीशी का होईना दोन्ही देशांमध्ये आयात-निर्यात सुरू असते. पाकिस्तान भारताला ड्रॉयफ्रूट, टरबूज, सिमेंट, सेंधा मीठ निर्यात करते. तर भारताकडून पाकिस्तानला दगड, चुनखडी, चष्म्यासाठी ऑप्टिकल वस्तू, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने, धातू संयुगे आणि चामड्याच्या वस्तू देखील आयात केल्या जातात.
भारत पाकिस्ताचे व्यापार संबंध आतापर्यंत कसे राहिले आहेत:
फाळणीनंतर अर्थातच भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आल्यानंतर लगेचच भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापार सुरू झाला होता. पण राजकीय अस्थिरतेमुळे भारत पाकचे व्यापर संबंधही सातत्याने बदलत आले आहेत.१९६५ मध्ये भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धानंतर दोन्ही देशांमधील व्यापार संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले गेले होते. पंरतु १९७० च्या दशकात ‘शिमला करार’ झाल्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारले गेले होते आणि व्यापारी संबंध पुन्हा सुरू झाले होते. त्यानंतर २०१९ पर्यंत दोन्ही देशांचे व्यापार संबंध वेगेवेगळ्या घटनांमुळे अस्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले, म्हणजेच कधी व्यापार संबंध चांगले तर कधी तणावाखाली दिसले. त्यानंतर 2019 मध्ये पुलवामा हल्ल्या झाल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200% शुल्क लावले, ज्यामुळे व्यापार जवळपास ठप्प झाला होता. अर्थातच २०१९ नंतर भारत पाकिस्तान यांच्यातला व्यापार मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. सध्या दोन्ही देशातील मोठे व्यापार दुबई आणि इतर देशांच्या मार्गे होतात. पंरतु आता भारताने घेतलेल्या निर्णयानुसार भारतात पाकिस्तानची कोणतीही गोष्ट थेट किंवा इतर देशांच्या मार्गाने आयात होणार नाही.
भारत पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षांत किती व्यवहार झाला आहे:
-एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारताने पाकिस्तानकडून 4 लाख 20 हजार डॉलर किंमतीच्या मालाची आयात केली आहे.
-2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत भारताने पाकिस्तानकडून जवळपास 28 लाख 60 हजार डॉलर किमतीच्या मालाची आयात केली होती.
– आता निर्यातीबद्दल सांगायचे झाल्यास तर एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान भारताकडून पाकिस्तानला 1.1 अब्ज डॉलर किमतीच्या मालाची निर्यात झाली होती.
– पण एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारताकडून पाकिस्तानला होणारी निर्यात घटून 44.765 कोटी डॉलरवर आली आहे.
भारत पाकिस्तानचा व्यापार बंद झाल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल:
आपण वरती माहिती घेतल्याप्रमाणे भारत पाकिस्तानचा व्यापार तसा मोठ्या प्रमाणावर होत नाही. भारताच्या एकूण परदेशी व्यापारामध्ये पाकिस्तानच्या व्यापाराचा टक्का फक्त ०. ०६ टक्के आहे. २०२४-२५ या वर्षात भारताचा एकूण व्यापार ८०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त होता तर यापैकी पाकिस्तानशी ५०० मिलियन डाॅलरपेक्षाही कमी व्यापार झाला होता. आता वरील सर्व माहिती लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येते की, पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद केल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होणार नाही. तसेच काही तज्ञांचे मते, असेही अनेक भारतीय लोक पाकिस्तामधून येणाऱ्या वस्तू वापरत नाही. त्यामुळे सैंधव मीठ सोडून उर्वरित कोणत्याही गोष्टीचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही.
पाकिस्तानवर काय परिणाम होईल:
खरेतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानवर गंभीर परिणाम होऊ शकतो.कारण पाकिस्तानला भारताकडून ज्या वस्तू निर्यात होतात, त्यात औषधांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान भारताकडून सुमारे ५० ते ६०% औषधे आयात करते, असे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ पाकिस्तानच्या अहवालात नमूद आहे. औषधांच्या बाबतीत पाकिस्तान भारतावर ५० ते ६०% अवलंबून आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानला मोठा फटका बसून पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.