केंद्रीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राव याची निवडणूकीचा ब्रँड आयकॉन म्हणून निवड केली आहे. त्याची औपचारिक घोषणा ही उद्या करण्यात येणार आहे.अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.या अभिनेत्यासाठी ही खूपच मोठी संधी आणि गौरवास्पद कामगिरी असणार आहे.
भारतातील पाच राज्यांमधील 161 दशलक्षाहून अधिक लोक पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करतील, अशी घोषणा भारताच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला केली होती.आता विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करताना अभिनेता दिसणार आहे.
नॅशनल आयकॉन लोकांना मतदानाबाबत जागरूक करतात. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त मंडळी मतदान करतात. राजकुमारआधी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला नॅशनल आयकॉन बनवले होते.
निवडणूक आयोग एखाद्याची आपला राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करतात तेव्हा त्या सेलिब्रिटीला निवडणूक आयोगासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करावी लागते.नियुक्ती करण्यात आलेल्या सेलिब्रिटीला जाहिरातींद्वारे,तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा इतर कार्यक्रमांद्वारे लोकांना मतदानाविषयी जागरुक करावे लागते.