सध्या टीव्हीवर ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ चालू आहे.या शोचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन आहेत. हा शो दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक हुशार स्पर्धक पाहायला मिळत आहेत. बिग बी या स्पर्धकांबरोबर धमाल करताना दिसतात. अशातच एका अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने १ कोटी रुपये जिंकले आहेत.
या मुलाचे नाव मयांक असून तो मूळचा हरयाणाचा आहे. मयांकने केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. स्पेशल केबीसी ज्युनियर वीकदरम्यान मयांकने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. हरयाणाच्या महेंद्रगड इथल्या मयांकने मंगळवारच्या एपिसोडमध्ये भाग घेतला होता. आठवीत शिकणाऱ्या मयांकचे ज्ञान पाहून अमिताभ बच्चनही थक्क झाले होते. विशेष म्हणजे त्याने ३.२ लाख रुपयांपर्यंत एकसुद्धा लाइफलाइन वापरली नव्हती. त्यानंतर थेट १२.५ लाख रुपयांच्या प्रश्नासाठी त्याने पहिल्यांदा लाइफलाइनचा वापर केला होता.
‘नव्याने सापडलेल्या खंडाला अमेरिका हे नाव असलेला नकाशा तयार करण्याचे श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला जाते ’, असा प्रश्न त्याला एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता. यासाठी त्याला चार पर्याय देण्यात आले होते. A- अब्राहम ओर्टेलियस B- गेराडस मर्केटर, C- जियोवानी बॅटिस्टा अग्निसी आणि D- मार्टिन वाल्डसिम्युलर असे हे पर्याय होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर मार्टिन वाल्डसिम्युलर असे होते. मयांकने हे अचूक उत्तर देऊन एक कोटी रुपये जिंकले.त्यानंतर त्याला सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्याचे योग्य उत्तर माहीत नसल्याने त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
मयंकने एक कोटी रुपये जिंकून इतिहास रचला आहे. एक कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसोबतच त्याला एक आलिशान कारही मिळाली आहे.