पुणे, दि. ३ डिसेंबर – कॅनव्हास या तमिळ भाषेतील लघुपटाने तिसऱ्या मिती लघुपट महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावले. विख्यात मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते अजय पूरकर यांच्या हस्ते विजेत्या लघुपटांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, एमएनजीएलचे फायनान्स व अकाउंटस् चीफ जनरल मॅनेजर मयुरेश गानू, मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांच्यासह मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार उपस्थित होते. ‘पंचवीस’ या मराठी लघुपटाला द्वितीय पारितोषिक मिळाले तर ‘कायमेरा’ या मल्याळम भाषेतील लघुपटाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन असल्यामुळे या महोत्सवात त्यासाठी सर्वोत्कृष्ट सामाजिक संदेश देणाऱ्या ‘द ब्लाईंड डेट’ या हिंदी लघुपटाला एक विशेष पारितोषिक देण्यात आले. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात हा दोन दिवसीय महोत्सव रंगला होता. या महोत्सवाला मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती लावली होती.
लेखकाचा आशय पोहोचवणे हेच सर्वांत महत्त्वाचे : अजय पूरकर
“फुल लेंथ फिल्म किंवा शॉर्ट फिल्म असे काही नसते. शेवटी कोणतीही कलाकृती करताना लेखकाने लिहिलेला आशय, त्याला जे मांडायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे सर्वांत महत्त्वाचे असते. प्रत्येकालाच कुठेतरी पहिले पाऊल टाकावे लागले. पण प्रत्येक फ्रेममागे तुमचा सखोल विचार हवा. टेक्निकवर प्रभुत्व मिळवता येते पण आशय पोहोचवणे अवघड असते.” असे यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अजय पूरकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, “या सगळ्यात चांगल्या लोकांचे मार्गदर्शन अतिशय उपयोगी ठरते. मिती फिल्म सोसायटीचे महत्त्व यासाठी आहे की इथे मार्गदर्शन करणारे लोक आहेत. मी काय आणखी चांगले देऊ शकतो याचा विचार सातत्याने प्रत्येकाने करायला हवा. जगभरात प्रदर्शित होणारे भरपूर सिनेमे, डॉक्युमेंटरीज पाहा. त्याचा उपयोग तुम्हाला होईल तुमची कलाकृती चांगली करायला” असे पूरकर पुढे म्हणाले.
Tags: NULL