मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. त्यानंतर लोकांची लक्षद्वीपला भेट देण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. तसेच याचा देशांतर्गत पर्यटनावर मोठा परिणाम होऊ शकतो. तर आता पंतप्रधान मोदींच्या या लक्षद्वीप दौऱ्याचे कौतुक बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने केले आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे कौतुक केले आहे. याबाबतची एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने म्हटले आहे की, “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि भव्य समुद्रकिनाऱ्यावर पाहून खूप आनंद झाला आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व आपल्याच भारतात आहे.”
सलमानने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “ही बेटे पाहून खूप छान वाटते. लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवणे खरोखरच अद्भुत आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही तर या सुंदर बेटांच्या विकासावरही परिणाम होईल.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1743920203451474167
पंतप्रधान मोदींनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. यावेळी त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि बेटवासीयांना संबोधित देखील केले. तसेच सध्या त्यांच्या या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
पीएम मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले आहे.