नवी दिल्ली, 13 जानेवारी : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची ‘आयएनडीआयए’ आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आलीय. विरोधकांच्या आघाडीची आज, शनिवारी ऑनलाईन बैठक झाली. यावेळी नितीश कुमार यांनी समन्वयक होण्यास नकार दिल्यानंतर सर्वानुमते खर्गे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
‘आयएनडीआयए’ आघाडीच्या आभासी बैठकीला उपस्थित असलेल्या शरद पवार यांनी सांगितले की, ‘आयएनडीआयए’ आघाडीची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आम्ही सर्वजण जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेऊ. यावर चर्चा झाली आहे. आघाडीचे नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे यांनी करावे, असे काहींनी सुचवले होते. सर्वांनी ते मान्य केल्याचे पवार यांनी सांगितले. आगामी काळात योजना आखण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. नितीश कुमार यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी घ्यावी, असे सर्वांनी सुचवले होते. मात्र, जे आधीपासून प्रभारी आहेत त्यांनी आपले काम चालू ठेवावे असे त्यांचे मत असल्याचे पवार म्हणाले.
यावेळी शरद पवारांनी ‘आयएनडीआयए’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत सांगतले की, निवडणुकीनंतर बहुमत मिळाले तर देशाला एक चांगला पर्याय देऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘आयएनडीआयए’ आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही प्रतिक्रिया समोर आली. जागा वाटपाची चर्चा सकारात्मक मार्गाने सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी ‘आयएनडीआयए’ आघाडीच्या सर्व पक्षांना ‘भारत जोडो न्याय यात्रेत’ सामील होण्यासाठी आमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले.