Milind Deora : आज (14 जानेवारी) काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर ते शिवसेनेत (शिंदे गटात) पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर आता देवरांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी हा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला.
मिलिंद देवरा यांच्या हाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भगवा झेंडा देत पक्षात प्रवेश दिला. तसेच मिलिंद देवरा यांच्यासह मुंबईतील 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा या शासकिय निवासस्थानी कार्यकर्त्यांची आणि देवरांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
पक्ष प्रवेश केल्यानंतर संवाद साधताना मिलिंद देवरा म्हणाले की, मी काँग्रेस पक्ष कधी सोडेन असे मला वाटले नव्हते. पण माझे काँग्रेस पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझे राजकारण हे नेहमीच सकारात्मक राहिले आहे. तसेच माझी विचारधारा ही महाराष्ट्रातील आणि देशातील नागरिकांची सेवा करणे आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेहनती आहेत आणि ते सर्वांसाठी उपलब्ध असतात. जनतेच्या वेदना त्यांना माहिती असतात, त्यामुळे त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. सोबतच शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे देखील हात मला बळकट करायचे आहेत.
दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्यासाठी मिलिंद देवरा हे इच्छुक आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 साली निवडून आले. त्यामुळे मिलिंद देवरांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होते. या कारणामुळेच राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या देवरांनी शिवसेनेमध्ये (शिंदे गट) जाण्याचा निर्णय घेतला.