आज (14 जानेवारी) काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी हा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला. मुख्यमंत्री शिंदेंनी मिलिंद देवरांच्या हाती भगवा झेंडा देत त्यांना पक्षात प्रवेश दिला. तसेच मिलिंद देवरा यांच्यासह मुंबईतील 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा या शासकिय निवासस्थानी कार्यकर्त्यांची आणि देवरांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिलिंद देवरांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज मिलिंद देवरांच्या मनात ज्या भावना आहेत त्याच भावना दीड वर्षांपूर्वी माझ्या मनात होत्या. तसेच कोणताही निर्णय घेताना बरेवाईट परिणाम होतात पण धाडस करावे लागते आणि डॅशिंग निर्णय घ्यावे लागतात.
काही ऑपरेशन असे असतात जे आपण सांगू शकत नाही. कारण मी डॉक्टर नसताना देखील दीड वर्षांपूर्वी ऑपरेशन केले होते. पण यामध्ये कोणाला टाका देखील लागला नाही. तर आज मी मिलिंद देवरांचे शिवसेनेत स्वागत करतो. काँग्रेस पक्षाशी देवरांची नाळ जोडली होती, त्यामुळे त्यांच्या मनात जी भावना आहे ती वस्तुस्थिती आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्यासाठी मिलिंद देवरा हे इच्छुक आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 साली निवडून आले. त्यामुळे मिलिंद देवरांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होते. या कारणामुळेच राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या देवरांनी शिवसेनेमध्ये (शिंदे गट) जाण्याचा निर्णय घेतला.