नुकताच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. आता काही दिवसांतच देशात लोकसभेच्या निवडणूक होणार आहेत. तर त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र त्याआधीच काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते , माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंद यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्यानंतर मिलिंद देवरा नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्याने काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. तसेच गिरीश महाजन यांनी येत्या १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसचे अनेक नेते, आमदार , पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत काही गुप्त बैठक पार पडल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये काँग्रेसला अजून खिंडार पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर का काँग्रेसच्या काही आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला , तर निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाची ताकद वाढू शकते. मात्र या शक्यता असल्या तरी काँग्रेस आता या विषयावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.