येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ज्या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण देश वाट पाहत आहे तो आता दूर नाहीये. या खास सोहळ्यासाठी राजकीय नेतेमंडळींसोबतच प्रसिद्ध सेलिब्रिटींना देखील आमंत्रित करण्यात आले होते. तर आता ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाची भूमिका साकारलेले सुनील लाहिरी हे तिघे प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. तसेच आता तिघेही या सोहळ्यासाठी अयोध्येला पोहोचले आहेत.
टीव्हीवरील राम-सीता आणि लक्ष्मण अयोध्येत पोहोचले आहेत. अरुण गोविल, दीपिका आणि सुनील लाहिरी या तिघांना अयोध्येत पाहून अयोध्यावासीयांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. लोक त्यांचे जंगी स्वागत करत आहेत. त्यांना कोणी हार घालत आहे तर कोणी सेल्फी काढत आहे. तसेच या ऑनस्क्रीन राम-सीता, लक्ष्मण यांना पाहण्यासाठी अयोध्यावासीयांनी मोठी गर्दी केली होती.
अयोध्येत पोहोचताच अभिनेते अरुण गोविल म्हणाले की, अयोध्येचे राम मंदिर राष्ट्रीय मंदिर ठरेल. गेल्या काही वर्षांत लुप्त झालेली संस्कृती पुन्हा संदेशाच्या रूपात जगभर पोहोचणार आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा संपूर्ण जगाला कळेल, हे मंदिर प्रेरणास्थान असेल. तर अभिनेत्री दीपिका चिखलिया म्हणाल्या की, रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तसेच लोकांनी भरभरून प्रेम दिले आहे आणि असेच रामायणातील पात्रांनाही प्रेम मिळत राहील.
पुढे अभिनेते सुनील लाहिरी म्हणाले की, मी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होत आहेत. मी खूप भाग्यवान आहे, कारण मला हा खास सोहळा पाहता येणार आहे. तसेच सध्या देशात निर्माण झालेले वातावरण अतिशय धार्मिक आणि अतिशय सकारात्मक आहे. यामुळे जगाला खूप सकारात्मक भावना मिळेल.