काल ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धाड टाकली होती.काल ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धाड टाकली होती. साळवींकडे एकूण उत्पन्नांपैकी ११८ टक्के उत्पन्न जास्त असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलगा आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहेत. काल सकाळी एसीबीने त्यांच्या घरी धाड टाकली होती. तब्बल दहा तास एसीबीने राजन साळवींच्या घरी झाडाझडती केली. यावेळी साळवी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी साळवींच्या घराबाहेर एकच गर्दी केली होती.
दरम्यान, कितीही चौकशी केली अगदी अटक केली तरी मी ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे साळवी यांनी सांगितले. दरम्यान एसीबीने आतापर्यंत सहा वेळा राजन साळवी यांची चौकशी केली आहे. तसेच सहाही वेळ साळवी चौकशीला एसीबीच्या अलिबाग कार्यालयात उपस्थित राहिले आहेत. ज्या दिवशी एसीबीने मला पहिली नोटीस धाडली तेव्हाच मला ही मंडळी नक्की एक दिवस माझ्या घरापर्यंत येणार हे मला माहिती असल्याचे साळवी म्हणाले आहेत.
एसीबीच्या धाडीवर बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले, ”अटक, जेल हे मला काही नवीन नाही आहे. मी राजन साळवी काय आहे हे, स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो. मला अशी कारवाई होणार अशी अपेक्ष होतीच.” ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. राजन साळवी , त्यांचे बंधू आणि पुतणे हे चौकशीला सामोरे गेले होते. भविष्यात मला कितीही त्रास झाला तरी देखील मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.