अष्टपैलू आणि देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीवर चित्रपट बनवणे हे एक मोठे आव्हान आहे. त्या व्यक्तीचा त्या काळातील मान्यवरांशी असलेला संबंध दाखवण्यासाठी, त्याची कोणती बाजू कमकुवत आणि कोणती मजबूत होती. तो माणूस कसा होता, असे अनेक प्रश्न दिग्दर्शकाच्या मनात आव्हाने म्हणून उभे राहतात. पण या सर्व आव्हानांवर मात करत दिग्दर्शक रवी जाधव यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाची कथा माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. अटलजींच्या बालपणातील संघर्षापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तसेच या चित्रपटात त्यांची साहित्यिक बाजू देखील दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांचे कवितेवरील प्रेम, त्यांचे कुटुंब आणि मित्रांशी असलेले नाते, राजकीय जीवनाचा उदय, कारगिल युद्ध, पोखरण अणुचाचणी इत्यादी घटनांचा प्रभाव दाखवण्यात आला आहे.
या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी वाजपेयींची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यांनी वाजपेयीजींचा बोलण्याचा स्वर उत्तमपणे पकडला आहे, जो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीच उतरला आहे. विशेष सांगायचे झाले तर जेव्हा रवी जाधव या चित्रपटाची कथा लिहीत होते, तेव्हा या भूमिकेसाठी त्यांच्याकडे पहिले नाव आले होते ते म्हणजे पंकज त्रिपाठी. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतरही असे वाटते की पंकज त्रिपाठींपेक्षा इतर कोणत्याही अभिनेत्याने ही भूमिका इतक्या चोखपणे साकारली नसती.
तसेच या चित्रपटात पियुष मिश्राने बाजपेयींचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. तर प्रमोद पाठक यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपापल्या पात्रांना पूर्ण न्याय दिला आहे. तसेच दिग्दर्शक रवी जाधव यांनी संपूर्ण झोकून देऊन चित्रपटाची कथा मोठ्या पडद्यावर जिवंत केली आहे. तर चित्रपटातील सर्व कलाकारांनीही उत्कृष्ट काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.