खऱ्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष भरकटविण्यासाठी धर्म, जाती आणि भाषेवरून समाजात तेढ उत्पन्न करण्याचे काम राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करत आहे असा आरोप करत काँग्रेस खासदार राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. आसाम व अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवरील राजगड-होलोंगी येथून राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा आसाममध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी हे विधान केले. राहूल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेमध्ये मणिपूर ते मुंबई प्रवास करत आहेत. या यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे.
“भाजपला लोकांचा पैसा हवा आहे, त्यासाठीच लोकांचे असे ध्यान भरटकवले जात आहे” असा आरोप करत राहूल गांधी पुढे म्हणाले, ‘आम्ही भारत जोडो यात्रेत लाखो लोकांना भेटलो. तरुणांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला, तर शेतकऱ्यांनी पिकाला योग्य भाव न मिळण्याविषयी चिंता व्यक्त केली. छोटे दुकानदार डिमॉनेटायझेशन आणि जीएसटीमुळे त्रस्त आहेत. देशाचे सरकार हे काही ठराविक उद्योगपतींच्या सोयीसाठी चालले आहे.”
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा हे भारतातील सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला. मी हेमंत बिस्व सरमा यांना अजिबात घाबरत नाही. त्यांना हवे ते त्यांनी करावे कारण ही राहूल गांधीची यात्रा नाहीये तर आसमाच्या जनतेची यात्रा आहे असे गांधी यावेळी म्हणाले.