मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात प्रवेश करणार आहे. अष्टविनायक पैकी एक असणाऱ्या रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेऊन जरांगे पाटील पुढे जाणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटलांचा मोर्चा आज पुण्यात येणार असल्याने वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. पुण्याकडून अहमदनगरला जाणारी वाहतूक आज सकाळी ६ वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना नगरला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. खराडी बायपासवरून वळण घेत मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्याने वाहनांना प्रवासाचा पर्याय देण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. २० जानेवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास मोर्चा काढून मुंबईत येऊन आंदोलन करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांनी मोर्चाला सुरुवात केली आहे. आज त्यांचा मोर्चा पुणे शहरात प्रवेश करणार आहे. मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्क ही दोन मैदाने त्यांनी आंदोलनासाठी मागितली आहेत. मात्र अद्याप त्यांना पोलिसांकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती समोर येत आहे. २६ जानेवारी रोजी मुंबईतील गल्ली-गल्लीमध्ये मराठेच दिसणार असे देखील ते म्हणाले आहेत. मात्र या मोर्चानंतर सरकार देखील ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आतापर्यंत राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार त्या सर्वाना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. तसेच सगेसोयरे असा उल्लेख असलेला वटहुकूम काढावा अशी त्यांची मागणी आहे. राज्यातील ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.