मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला आहे. २० जानेवारी रोजी जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केले आहे. २६ तब्बल तीन कोटी मराठे येतील असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच २६ जानेवारी रोजी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. मात्र वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांचा आंदोलनाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने सदावर्ते यांची याचिका स्वीकारली असून आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यावर तातडीची सुनावणी होणार आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांनी दुसऱ्या खंडपीठापुढे याचिका करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने काही कारणास्तव या याचिकेवर सुनावणीसाठी नकार दिला आणि हे प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे वर्ग केले. त्यानंतर न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने याचिका स्वीकारली आहे. याचिकेवर उद्या सुनावणी घेऊ असे खंडपीठाने सांगितले, मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीजवळ पोहोचत आहेत, त्यामुळे तातडीने सुनावणी घेऊन या विषयावर तोडगा काढावा असा युक्तिवाद केला.
न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे दुपारी अडीच वाजता या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीमध्ये सदावर्ते काय युक्तिवाद करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा विविध मुरूडयांवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.