आज लोणावळा येथे मुक्कामी असणारा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा उद्या मुंबईत धडकणार आहे. २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली होती. मात्र आता त्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारली आहे. जरांगे पाटील आज मुंबईच्या वेशीवर पोहोचणार आहेत. मात्र त्याआधीच पोलिसांनी उपोषणाची परवानगी नाकारली आहे.
दरम्यान, मुंबईतील आझाद पोलिसांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि नोटीस बजावली. आझाद मैदानाऐवजी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कार्पोरेशन पार्क मैदान सुचवले आहे. आझाद मैदान पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारताना त्यांनी अनेक कारणे जरांगे पाटलांना सांगितले. यात मराठा आंदोलक एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईत आल्यास मुंबईची दैनंदिन वाहतूक कोलमडेल. मुंबईचे जनजीवन विस्कळीत होईल. मुंबईतल्या कुठल्याही मैदानात एवढे आंदोलक बसू शकतात एवढी क्षमता नाही. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कारणे पोलिसांनी जरांगे पाटलांना सांगण्यात आले.
मात्र मुंबईत जाऊन आझाद मैदानावर उपोषण करण्याबाबत मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. आम्हालाही मुंबईला येण्याची हौस नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतः येऊन यावर तोडगा काढावा असे देखील जरांगे पाटील म्हणाले.