गेले साडे चार ते पाच महिने मराठा समाजाला आरक्षण मिळवले यासाठी मनोज जरांगे पाटलांनी प्रदीर्घ लढा उभारला होता. आज अखेर त्याला यश मिळाले आहे. मराठा समाजाचा २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटीमधून निघालेला मोर्चा नवीन मुंबईत येऊन धडकला होता. सरकारचे हा मोर्चा मुंबईत येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी असणाऱ्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबद्दल राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला आहे. तो अध्यादेश मराठा समाजाच्या हाती सुपूर्त करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी आपले उपोषण सोडले. मागण्या पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा बांधवांनी एकच जल्लोष साजरा केला. आजच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्याचप्रमाणे माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना सल्ला देखील दिला असल्याचे म्हटले जात आहे.
मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले, ”श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !”
दरम्यान, काल रात्री राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. जरांगे पाटील यांनी आज निर्णय न झाल्यास नवीन मुंबईतून मुंबईत जाण्याचा व आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र रात्री उशिरा झालेची शिष्टमंडळाची आणि जरांगे पाटलांची चर्चा यशस्वी झाली. सुधारित धेदेश जरांगे पाटील यांनी मान्य केला. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सकाळी मुख्यमंत्र्यानी स्वतः वाशी येथे जाऊन जरांगे पाटलांकडे अध्यादेश सुपूर्त केला.