27 जानेवारीपासून फिल्मफेअर पुरस्कार 2024 सोहळा सुरू झाला आहे. यावेळी हा पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधी नगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या पुरस्कार विजेत्यांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काहींची नावे आज म्हणजेच रविवारी कळणार आहेत.
विशेष सांगायचे झाले तर शाहरूख खानचा ‘जवान’ या चित्रपटाला यावर्षीच्या फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्समध्येही या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. तसेच रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअरमध्ये बाजी मारली आहे. याशिवाय, सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन श्रेणीमध्येही ‘ॲनिमल’ने पुरस्कार पटकावला आहे.
त्याचबरोबर विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाने फिल्मफेअरमध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा या श्रेणीत प्रथम पुरस्कार मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइनचा पुरस्कारही मिळाला आहे.
या चित्रपटांसोबतच आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या ‘रॉकी और रानी’ चित्रपटातील ‘क्या झुमका’ या गाण्यासाठी गणेश आचार्य यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. सोबतच विधू विनोद चोप्राच्या ’12वी फेल या’ चित्रपटालाही फिल्मफेअरमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ’12वी फेल’ चित्रपटाला उत्कृष्ट संपादनासाठी पुरस्कार देण्यात आला आहे.