झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडी चौकशी होणार होती. गेले अनेक दिवस हेमंत सोरेन हे ईडीच्या रडारवर आहेत. मात्र आज झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने आज हेमंत सोरेन यांची रांची येथील निवासस्थानी चौकशी केली. गेल्या १० दिवसांमध्ये ईडीने हेमंत सोरेन यांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे. यापूर्वी २० जानेवारी रोजी या प्रकरणासंदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली होती.
आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रांचीमध्ये सीआरपीसी १४४ कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली होती. दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या चौकशीपूर्वी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या नेतृत्वाखालील युतीचे आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकत्रितपणे जमले होते.
दरम्यान,झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी होणार आहे. झारखंडमधील जमीन घोटाळ्यात झालेल्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी कदाचित आज त्यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. ईडीच्या पथकाने सोमवारी सोरेन यांच्या निवासस्थानावर छापेमारी केली. मात्र हेमंत सोरेन यावेळी तिथे उपस्थित नव्हते. तब्बल ४० तास ते गायब होते. यावरून भाजपाने त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. झारखंड भाजपाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी हेमंत सोरेन यांच्यावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी एक्स वर ‘बेपत्ता’ असे सोरेन यांचे पोस्टर शेअर केले. तसेच सोरेन यांची माहिती देणाऱ्याला ११ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
या महिन्याच्या सुरुवातीला, तपास यंत्रणांनी राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाच्या मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीचा भाग म्हणून सोरेन यांचे माध्यम सल्लागार, साहिबगंज जिल्ह्यातील अधिकारी आणि माजी आमदार यांच्या जागेवर छापे टाकले होते.ईडी २०२२ पासून राज्यातील बेकायदेशीर खाणकामातून निर्माण झालेल्या १०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत या प्रकरणात १४ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे. रंजन यांनी राज्याच्या समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीच्या उपयुक्त म्हणून काम केले होते.