काल (2 फेब्रुवारी) प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे बॉलिवूडसह सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. पूनम पांडेच्या निधनाची बातमी ऐकताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता, तर काहींना तिच्या निधनाच्या बातम्यांवर विश्वासच बसत नव्हता. अशातच आता पूनम पांडेचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. निधनाच्या चर्चांना पूर्णविराम देत पूनम पांडेने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
पूनम पांडे ही जिवंत असून तिने याबाबतचा एक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सर्व्हायकल कॅन्सरबाबत पूनम पांडेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत पूनमने म्हटले आहे की, मला तुम्हा सर्वांसोबत काही महत्त्वाचे शेअर करायचे आहे आणि ते म्हणजे मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. पण या रोगाचा सामना कसा करायचा याबाबत माहिती नसल्यामुळे हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत.
सर्व्हायकल कॅन्सर हा इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. या कर्करोगाचे लवकर निदान होणे आणि त्यावर HPV लस घेणे हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या रोगाबाबत आपण जागरूकता पसरवूया, एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला या रोगावरील उपायांबद्दल माहिती मिळेल याची खात्री करूया.चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCarnivalCancer चा अवलंब करूया, असे पूनम पांडेने म्हटले आहे.
दरम्यान, पुनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या टीमने काल तिच्या निधनाची माहिती दिली होती. त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटले होते की, हे सांगणे आमच्यासाठी खूपच कठीण आहे. पुनमला सर्व्हिकल कँसर झाला होता. आमच्यासाठी हा मोठा संघर्षाचा काळ आहे. ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळे मोठ्या धक्क्यात आहोत. पुनमचे असे अकाली जाणे आपल्या सर्वांसाठी मोठे धक्कादायक आहे.