गुजराती लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी माफी मागितली आहे. याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेय. यापूर्वी तेजस्वी यांनी सदर प्रकरण गुजरातच्या बाहेर स्थानांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश राखून ठेवला होता.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी , “केवळ गुजरातीच ठग असू शकतात” असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्या विरोधात फौजदारी मानहानी खटला सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्या. एस.एस. ओक आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने तेजस्वी यांना नोटीस बजावत 7 दिवसात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत माफी मागितली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तेजस्वी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, यापूर्वी फौजदारी मानहानीच्या तक्रारीवरील कारवाईला स्थगिती दिली होती आणि तक्रारदार हे गुजरातचे रहिवासी हरेश मेहता यांना नोटीस बजावली होती. मेहता हे स्थानिक व्यापारी आहेत. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 499 आणि 500 अंतर्गत गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारीत म्हटले आहे की, तेजस्वी यादव यांनी मार्च 2023 मध्ये बिहारची राजधानी पाटणा येथे माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आताच्या घडीला केवळ गुजरातीच ठग असू शकतात आणि त्यांनी केलेली फसवणूक माफ केली जाईल. तसेच जर गुजराती लोक, एलआयसी किंवा बँकांचे पैसे घेऊन पळून गेले तर त्याला जबाबदार कोण? यादव यांच्या या वक्तव्यामुळे सर्व गुजरातींची बदनामी झाल्याचा दावा मेहता यांनी केला. याचाच दाखला देत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.